मिठाच्या अवतीभवती !!

जेवण कितीही चांगले झाले तरी मीठाशिवाय जेवण पूर्ण होऊच शकत नाही. मीठ हा जेवढा महत्वाचा तेवढाच दुर्लक्षित पदार्थ. चव आणण्यासाठी मीठाचा वापर होतोच, पण त्याच बरोबर मांस, मासे खारवण्यासाठी त्याचा उपयोगी होतो. आज सहजासहजी उपलब्ध असलेल्या या मीठाला एकेकाळी सोन्याचा दर्जा होता हे सांगूनही पटणार नाही. आज ज्याप्रमाणं तेलाचं राजकारण होतंय तसंच या मीठासाठी लढाया झाल्या, राजकारण झालं, क्रांत्या झाल्या, सत्ता उलटल्या. हे सगळं ऐकून तुम्हांला हसू येईल पण आपल्याला कदाचित माहित नसेल, आज महिन्याच्या अखेरीस तुम्ही जी ‘सॅलरी’ मिळवता त्यातला सॅलरी हा शब्द देखील मीठापासून बनलाय.

महाकवी होमरने मीठाला स्वर्गीय पदार्थ म्हटलंय तर प्लोटोने मिठाला देवांचा आवडता पदार्थ म्हटलंय. अरब लोक तर मीठ हातात घेऊन वचन द्यायचे…. आज सहज मिळणाऱ्या मीठाच्या मागे किती मोठा इतिहास आहे, हे आपल्याला कमीच माहिती असते…

ग्रेट वॉल ऑफ चायना

History_Builders_of_The_Great_Wall_42710_reSF_HD_1104x622-16x9स्रोत

आता ग्रेट वॉल ऑफ चायनाचा आणि मीठाचा काय संबंध ? पण मीठाचा आणि चायनाच्या भिंतीचा मोठा संबंध आहे.

चीनमध्ये मीठावरून अनेकदा राजकारण घडलं. मीठासारख्या सर्व सामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत उपयोगी पडणाऱ्या पदार्थावर चीनी सरकारचा ताबा असल्यानं सरकारनं  त्यावर भरमसाठ कर लादून नफेखोरी करायला सुरुवात केली. नफेखोरीतून सरकारनं  अमाप महसूल मिळवला आणि याच पैश्यातून काही सार्वजनिक कामं पार पडली. त्यातलीच एक कामगिरी म्हणजे ‘ग्रेट वॉल ऑफ चायना’. हे सगळं घडत होतं चीनच्या ‘कीन’ राजघराण्याच्या काळात. परकीय ‘हूण’ आक्रमणांपासून बचाव करण्याकरिता या भव्य भिंतीची रचना करण्यात आली होती.

जगातली पहिली मीठाची विहीर ही चीन मध्येच तयार झाली. ‘ली बिंग’ या ‘शु’ प्रांताच्या नायकाने सिच्वानमध्ये ही विहीर शोधून काढली. भूगर्भातून झिरपणाऱ्या मीठाला त्याने साठवलं.

मीठाचं महत्व चीनमध्ये एवढं वाढलं कि श्रीमंतीचं प्रदर्शन करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ लागला. याच मीठापासून इ. स. १०६६ साली चीनी लोकांनी बंदुकीसाठी दारू तयार केली. मीठाचा असा उपयोग आणखी कुठेचं झाला नसावा, नाही का ?

तागझा मधील मीठाची मशीद

Image result for taghaza saltस्रोत

इब्न बतुत या प्रवाशानं लिहून ठेवल्याप्रमाणं तागझामध्ये झाडं नाहीत तर फक्त वाळवंट आहे. जमिनी खाली मोठमोठ्या मीठाच्या लाद्या निघतात. तिथे मीठाचा वापर चलन म्हणून केला जातो.

तागझा हे रॉक साल्ट मिळवण्यासाठी एक प्रमुख ठिकाण होतं. त्याकाळात उंटावरून मीठाच्या लाद्या माल्टापर्यंत पोहोचवल्या जात. तिथल्या उत्पन्नाचं मुख्य साधन हे मीठच होतं. पूर्ण जगासाठी जरी ते खाण्याचं मीठ असलं तरी तागाझामध्ये ते बांधकामाचं साहित्य म्हणून बघितलं जायचं. तागझामधली एक पूर्ण मशीद ही मीठाच्या लाद्यांनी तयार केली होती. मीठाचा वापर हा विटांसारखाही व्हायचा.

रोम मध्ये मीठाचा उपयोग चलन म्हणून

रोमन आरोग्य देवता सॅलस हिला नैवेद्य म्हणून पहिला पदार्थ मीठ वाहायचे. रोमन साम्राज्यात सामान्य नागरिकांच्या अधिकारांवरून नेहमी तणाव असायचा. यातील एक कारण मीठ हे देखील होतं. काही काळानंतर मीठ सामान्य लोकांना मिळू लागले. आश्चर्य म्हणजे त्याकाळात मीठावर सबसिडी मिळायची.

मीठाचं महत्व बघता रोमन सैनिकांना दिल्या जाणाऱ्या पगाराचा काही भाग हा मीठाच्या रुपात असायचा. आजच्या काळात वापरण्यात येणारा सॅलरी हा शब्द ‘सल्ट’ शब्दापासून तयार झालाय.

मीठ एवढे अमूल्य असण्याचं मोठं कारण म्हणजे थंडीत मांस टिकून राहावं म्हणून मीठाचा मोठ्या प्रमाणात उपयोग व्हायचा. मीठाच्या बदल्यात गुलामही विकले जायचे, यावरून तुम्हाला मीठाच्या त्यावेळच्या किमतीची कल्पना येईल

मीठ आणि चर्च

प्राचीन काळी जर्मनीच्या आसपासच्या परदेशात मीठाच्या खाणीजवळ चर्च असायचे. याचं मुख्य कारण म्हणजे जर्मनीतल्या एका समजानुसार मीठाच्या खाणीत केलेली प्रार्थना देव लवकर ऐकतो. मीठापासून मिळणारा नफा हा चर्चच्या पुढ्यातही पडायचा. आता प्रार्थना देव ऐको किंवा न ऐको, मात्र यामुळे खाणीजवळ चर्चची भरभराट झाली हे मात्र खरं.

बॉर्डर बॉर्डर !

आज भारत पाकिस्तान काश्मीरसाठी जसे झगडतायत तसे ‘बव्हेरिया’ आणि ‘ऑस्ट्रिया’ हे देश मीठाच्या खाणीसाठी भांडत होते. ‘हॅलेइन’ ही मीठाची खाण या दोन्ही देशांच्या सीमेवर आहे आणि त्यामुळे दोन्ही देशातले लोक या खाणीत उतरत आणि मीठ पळवून नेत. यावरून अनेकदा मारामाऱ्या होत.

फ्रांसमधला मीठ घोटाळा !

अधिकाधिक गुन्हेगार तयार करण्यासाठी काय करावं? तर अधिकाधिक कायदे तयार करा म्हणजे गुन्हेगार अपोआप तयार होतील. फ्रांसमध्ये पूर्वीच्या काळी श्रीमंतांपासून गरीबांपर्यंत सर्वांना मीठावर कर द्यावा लागायचा. आठ वर्षावरील प्रत्येक नागरिकानं सात किलो मीठ सरकार देईल त्या किमतीत विकत घेतलंच पाहिजे, असा कायदाच होता. प्रत्येक व्यक्तीनं एवढं मीठ घेऊन पुन्हा ते मांस, मच्छी खारवण्यासाठी वापरणे हा गुन्हा समजला जायचा.

य़ा जाचाला कंटाळून दक्षिण फ्रांसमधल्या शेतकऱ्यांनी उठाव केला. उठावामुळे कर कमी तर झाला, पण मीठ उत्पादकांवरचा कर वाढला. याचा परिणाम म्हणजे कर चुकवण्यासाठी स्मगलिंगच्या धंद्याला ऊत आला. आता अश्या अवैध धंद्यातले लोक ‘निरुपद्रवी’ कसे असतील, त्यांच्यात मारामाऱ्या खून-खराबे सुरु झाले. जेल माणसांनी तुंबले आणि यातूनच झाली फ्रेंच राज्यक्रांती…

फ्रेंच राज्यक्रांती झाली त्याला कारणीभूत असलेल्या अनेक कारणांपैकी एक मोठं कारण म्हणजे मीठ होतं.

भारतातलं सैंधव मीठ !

Image result for gandhiji in dandi marchस्रोत

भारतात प्राचीन काळापासून मीठाचा उपयोग केला जात आहे. असं म्हणतात कि प्राचीन काळी मीठाची पूजा देखील व्हायची. भारतात जवळ जवळ ३०० वर्षापूर्वी डोंगी भागातल्या खाणींतून मीठ काढण्याचं काम सुरु झालं. या मीठाला सैंधव मीठ म्हणतात. हे मीठ खाण्यासाठी सर्वोत्तम मानलं जायचं.

मौर्य काळापासून ते मुगल, मराठा काळात मीठावर बसवलेला कर हा सरकारी उत्पन्नाचा भाग होता. ही तर झाली पुरातन काळातील गोष्ट. पण स्वतंत्रपूर्व काळात इंग्रजांनी लादलेल्या भरमसाठ करामुळे ‘दांडी यात्रा आणि मीठाचा सत्याग्रह झाला, हे अगदी ताजं उदाहरण देता येईल.

मृतसमुद्र

Image result for dead seaस्रोत

हा तर इतिहास झाला. पण मृतसमुद्र ही अशी जागा आहे  की जिथं ठाई ठाई मीठ आहे. भौगोलिकदृष्ट्या हा समुद्र नसून तलाव आहे, आपल्या खारटपणामुळे हा समुद्र सर्वाधिक खाऱ्या जलाशयात मोडतो.

मृतसमुद्र इस्राएल व जॉर्डन याच्या सरहद्दीवर आहे. मृतसमुद्राचा किनारा म्हणजे वाळवंटच.  पण तश्या जागेतही इस्राएल सरकारने नंदनवन वसवलं आहे. या भागातील पाणी आणि वातावरण आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे सांगत इस्राएलच्या सरकारने या भागात ‘हेल्थ स्पा’ उभारले आहेत. यामुळे या मृत जागी सुद्धा पर्यटकांची गर्दी होत आहे.

हिंदू पुराणांत,  वेदांत तसेच बायबलच्या जुन्या करारात मीठाचा उल्लेख आढळतो. जगाच्या कानाकोपऱ्यात आज मीठ  सहज उपलब्ध आहे, पण त्याच्या मागची बाजू ही दिसते तेवढी सोप्पी नाही.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: